रायगड - लोकशाही दिनाकडे अधिकाऱ्यांची पाठ; कारवाईची मागणी
रायगड, 07 एप्रिल (हिं.स.)।रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाकडे प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे तातडीने निराकरण व्हावे
Officials turn their backs on Lokshahi Din; Pandit Patil angry, demands action


रायगड, 07 एप्रिल (हिं.स.)।रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाकडे प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे तातडीने निराकरण व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमालाच अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे खीळ बसत असल्याची टीका होत आहे. यावरून भाजपचे माजी आमदार पंडित पाटील यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

लोकशाही दिन हा उपक्रम समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीनंतर सुरू करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात या उपक्रमाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांनी यावेळी आपली नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे त्यांच्या समस्या प्रलंबित राहत असल्याची तक्रार केली. “अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत, मात्र लोकप्रतिनिधींच्या बैठकीसाठी तत्पर असतात,” असा आरोपही यावेळी करण्यात आला.

या लोकशाही दिनात जिल्ह्यातील अनेक गंभीर प्रश्न मांडण्यात आले. जलजीवन मिशन अंतर्गत मोठा निधी खर्चूनही अनेक गावांमध्ये पाणीटंचाई कायम असल्याचे सांगण्यात आले. खार आबोली धरणाचे कालवे अनेक वर्षांपासून रखडले असून त्यामुळे शेतीवर परिणाम होत आहे. तसेच कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला असून किनारी भागात डंपिंग ग्राउंडची समस्या वाढली आहे.

दरम्यान, कुर्डूस, शिहू आणि बेणसे परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करून उत्खनन सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या बंधाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. महिनाभरापूर्वी दिलेल्या आश्वासनांनंतरही कारवाई न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर लोकशाही दिनास गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे. त्यांनी ही बाब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande