
परभणी, 07 एप्रिल (हिं.स.)। परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा वसमत रोडवरील बी. रघुनाथ सभागृहात होणार असल्याची माहिती नगर सचिव विकास रत्नपारखे यांनी दिली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील अनुसूची ‘ड’ प्रकरण-2 मधील नियम क्रमांक 1 ड (एच) अन्वये ही सभा आयोजित करण्यात आली असून, महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, उपमहापौर गणेश देशमुख तसेच आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या उपस्थितीत सभा पार पडणार आहे. सभेच्या कार्यक्रम पत्रिका क्र. 03 नुसार महत्त्वाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये विषय क्र. 06 अंतर्गत महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 20(2) अन्वये स्थायी समितीच्या एकूण 16 सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी सुधारित कलम 31-अ नुसार महापालिकेतील पक्ष किंवा गटांच्या संख्याबळाच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. तसेच विषय क्र. 07 अंतर्गत दि. 4 ऑगस्ट 2012 रोजीच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. 8 नुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्याचा विषयही चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. प्रस्तावित सभेस सर्व संबंधितांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis