
रायगड, 07 एप्रिल, (हिं.स.)। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) अंतर्गत युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप दिली जाणार असून प्रतिमहा सुमारे ९,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. रायगड जिल्ह्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड येथे Customer Care Service आणि एचडीएफसी बँक येथे Sales & Marketing क्षेत्रात इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.
या योजनेमुळे युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी, व्यावसायिक नेटवर्क तयार होणे तसेच व्यक्तिमत्व विकासास मोठी चालना मिळणार आहे. सध्या या योजनेचा तिसरा टप्पा (Round 3) सुरू असून उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा.
या योजनेंतर्गत उमेदवारांना स्टायपेंड व्यतिरिक्त Life व Personal Accident Insurance, तसेच एकवेळचे ६,००० रुपयांचे विशेष अनुदान दोन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे. हे सर्व पैसे DBT पद्धतीने थेट बँक खात्यात जमा केले जातील. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना अंतर्गत विमा संरक्षणही दिले जाणार आहे.
या योजनेसाठी साधारण १८ ते २५ वयोगटातील, दहावीपासून पदवीधरांपर्यंत शिक्षण घेतलेल्या भारतीय नागरिकांना अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)