
पुणे, 07 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर परिवार सर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार असून हे अभियान दि. ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांच्या युवक-युवती व इतर उमेदवारांच्या प्रगतीसाठी ‘अमृत’ संस्थेमार्फत विविध प्रशिक्षण, कौशल्यविकास व प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्यात येतात. या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य आदी सुमारे २५ जातींचा समावेश असून सर्वेक्षणानंतर या यादीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अमृत संस्थेमार्फत सध्या व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, रोजगारक्षम कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन तसेच उद्योगवृद्धीसाठी वैयक्तिक व्याज परतावा योजना अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा अधिक परिणामकारक विस्तार करण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या गरजेनुसार नवीन मूल्यवर्धित योजना तयार करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.
या सर्वेक्षणाद्वारे लक्षित गटातील कुटुंबांची अचूक संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, उपलब्ध स्थानिक संसाधने, कौशल्ये व आवडी यांचा अभ्यास करून भविष्यात अधिक परिणामकारक योजना तयार करण्याचा मानस आहे. तसेच, या माध्यमातून अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांच्या सूचना व अभिप्रायांच्या आधारे नव्या उपक्रमांची आखणी करणे हा दुहेरी उद्देश साध्य करण्यात येणार आहे.
सर्वेक्षण कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्षित गटातील कुटुंबांशी थेट संपर्क साधणार आहेत. तसेच संबंधित समाजातील विविध संस्था, संघटना, मंडळे यांच्याकडूनही प्रातिनिधिक माहिती संकलित करण्यात येणार आहे. लक्षित गटातील कुटुंबे, संस्था व संघटनांनी या कालावधीत अमृतच्या जिल्हा किंवा विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून आपल्या कुटुंबाची अथवा संस्थेची नोंदणी करावी व विविध योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन अमृत संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु