
कोल्हापूर, 07 एप्रिल (हिं.स.)। प्रशासन आणि लोकशाही व्यवस्थेचा समन्वय साधून कोल्हापूर शहर “बेस्ट” करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज पत्रकार बैठकीत दिलं. कोल्हापूर महापालिकेच्या नूतन आयुक्तपदी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी मावळत्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. कोल्हापुरात आगमन होताच त्यांनी थेट श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर महापालिकेत जाऊन मावळत्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी महापौर रुपाराणी निकम यांचीही भेट घेतली.महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन “नागरिकांना चांगली वागणूक द्या” असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला. अधिकाऱ्यांच्या वागणुकीवरून प्रशासनाची प्रतिमा तयार होत असते, असंही त्यांनी सांगितलं.त्यानंतर घेतलेल्या पत्रकार बैठकीत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळेपणानं उत्तरं दिली. “मी डॉक्टर झालो आणि योगायोगानं IAS झालो,” असं सांगत आजपासून मी कोल्हापूरवासी झालो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकशाही यांचा समतोल राखत काम करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध विकासावर विशेष लक्ष दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. तसंच अतिक्रमणाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“मी मोठी आश्वासने देणार नाही, मात्र कोल्हापूरचा सर्वांगीण विकास नक्कीच करेन, कोल्हापूर शहराला “बेस्ट” करण्यासाठी प्रयत्न करू” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी किमान चार दिवस कोल्हापुरात थांबावं, यासाठी शहराचं अर्थकारण वाढवणाऱ्या नव्या योजना राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.राजकारणापेक्षा नागरिकांचा सहभाग आणि लोकप्रतिनिधींचं सहकार्य यावर भर देत कोल्हापूर शहर अधिक सक्षम आणि आदर्श बनवण्याचा निर्धार त्यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar