
परभणी, 07 एप्रिल (हिं.स.) : परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे नेते रामराव वडकुते यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. वडकुते यांनी ईश्वरचरणी साक्ष ठेवून मराठीतून शपथ घेतली. यावेळी सभागृहातील सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
शपथविधीनंतर खासदार वडकुते यांनी सभापती राधाकृष्णन यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी सौ. इंदुमती वडकुते, मुलं दिलीप वडकुते, शशिकांत वडकुते, डॉ. प्रल्हाद वडकुते, विठ्ठलराव वडकुते, तसेच आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, तसेच समाजातील विविध नेते उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रीय धनगर समाजाचे अध्यक्ष राजेंद्र पाल यांचाही समावेश होता.याचप्रमाणे, वडकुते यांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची केंद्रीय कार्यालयात भेट घेऊन सदिच्छा व्यक्त केल्या.राज्यसभेत वडकुते यांच्या प्रवेशामुळे परभणीसह महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात नवा उत्साह निर्माण झाला आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis