
रायगड, 07 एप्रिल, (हिं.स.)। समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या बातम्यांनंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये आता अंशतः बदल करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश जारी केले आहेत. सध्या जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझेल विक्री पूर्ववत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोणत्याही कंपनीकडून किंवा व्यक्तीकडून पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात डिझेल उचल होत नाही याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वाहनांव्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या डिझेलची नोंद व्यवस्थित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पेट्रोल विक्रीबाबत मात्र कडक नियम लागू ठेवण्यात आले आहेत. पेट्रोलची विक्री केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच करण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कॅन, बाटली किंवा डब्यात पेट्रोल विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अपवाद म्हणून स्पीड बोटसाठी आवश्यक पेट्रोल केवळ परवानाधारकांना देण्याची मुभा देण्यात आली आहे.
याशिवाय सर्व पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि विक्री नोंदी नियमित अद्ययावत ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनधिकृत साठा किंवा विक्री आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सदर आदेश सार्वजनिक हिताच्या दृष्टीने जारी करण्यात आला असून सर्व संबंधितांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)