
अमरावती, 07 एप्रिल, (हिं.स.)। अमरावतीतील गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या सराफा व्यावसायिकावरच्या दरोड्याच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावत सुमारे १ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीस परत दिला.
दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बालाजी नगर येथील सुशांत शेरेकर हे आपले ‘सुमित्रा ज्वेलर्स’ दुकान बंद करून सोने व रोकड असलेली पिशवी मोपेडच्या डिक्कीत ठेवून घरी जात होते. यावेळी काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तिघांनी त्यांची गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांना खाली पाडले व डिक्कीतील सोने-नगदी लंपास करून फरार झाले.
तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत ७ आरोपींना अटक केली. यात चारचाकीतील पाच व रेकी करणारे दोन आरोपींचा समावेश आहे. आरोपींकडून ६६१.०३० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत सुमारे ९९.१५ लाख) व १.१९ लाखांची रोकड असा एकूण १,००,३४,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल व शस्त्रेही ताब्यात घेण्यात आली.
या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त सोन्याचे दागिने व रोकड आज (दि. ७ एप्रिल २०२६) रोजी पोलीस आयुक्तांच्या हस्ते फिर्यादीस सुपूर्द करण्यात आली. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सदर ची कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला,पोलीस उपायुक्त श्याम घुगे (परीमंडळ २), पोलीस उपायुक्त गणेश शिंदे (परीमंडळ १), पोलीस उपायुक्त (मुख्यालय) रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे, गाडगेनगर विभाग,अमरावती शहर यांचे निर्देश व सुचनांनुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, गुन्हेशाखा वपोनि संदिप चव्हाण, पोनि गुन्हे विजया पंधरे, सपोनि मनोजकुमार मानकर, सपोनि मनिष वाकोडे, सपोनि महेश इंगोले, पोउपनि गजानन सोनुने, गुन्हे शाखा पथक व गाडगेनगर डीबी पथक यांचेद्वारे संयुक्तपणे करण्यात आली. गुन्हयाचा तपास सपोनि मनोजकुमार मानकर पो.स्टे. गाडगेनगर यांनी पुर्ण करून आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र मा. न्यायालयात सबळ पुराव्यांसह दाखल करण्यात आलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी