
सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.)। बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने संविधान भवनासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सोलापूर महानगरपालिकेचे महापौर श्री. विनायक कोंड्याल यांचा आज सत्कार करण्यात आला. मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त अध्यक्ष श्री. आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उत्सव अध्यक्ष नागेश इंगळे, सचिव रॉकी बंगाळे, उपाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, चाचा सोनवणे, अमोल कदम, संतोष घोलप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणुकीसंदर्भात विविध उपाययोजनांबाबत निवेदन देण्यात आले. मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, झाडांच्या फांद्यांची छाटणी, सिग्नल व्यवस्थापन, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, वाहतूक नियंत्रण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संविधान भवनासाठी मंजूर करण्यात आलेला निधी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणारा उपक्रम असून, शहरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल. तसेच जयंती मिरवणुकीसाठी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.दरम्यान, आगामी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन आणि महामंडळ यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड