परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; पात्र विद्यार्थ्यांना अर्जाचे आवाहन
रायगड, 07 एप्रिल (हिं.स.)। परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; पात्र विद्यार्थ्यांना अर्जाचे आवाहन


रायगड, 07 एप्रिल (हिं.स.)। परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील अधीक्षक माधुरी पाटील यांनी दिली आहे.

ही योजना महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असून परदेशातील उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे तर पीएचडीसाठी ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, तसेच त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला आवश्यक आहे.

या शिष्यवृत्तीअंतर्गत शिक्षण शुल्क, परदेश प्रवासाचा इकॉनॉमी वर्गातील खर्च (परतीसह), निर्वाह भत्ता आणि आरोग्य विमा खर्च शासनाकडून दिला जाणार आहे. अमेरिका व इतर देशांसाठी वार्षिक USD १५,४०० तर युकेसाठी GBP ९,९०० इतका निर्वाह भत्ता मंजूर आहे. तसेच आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र तरतूदही करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी QS जागतिक क्रमवारीत २०० च्या आत असलेल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे पूर्ण व सुस्पष्ट असणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्जांवर कार्यवाही केली जाणार नाही.

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://fs.maharashtra.gov.inया संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह दिनांक १५ मे २०२६ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande