
लातूर, 07 एप्रिल (हिं.स.)। भारतीय सैन्यातील सेवा ही नोकरी नसून ती राष्ट्रमातेच्या चरणी अर्पण केलेली साधना आहे. सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून, प्रत्येक क्षण देशासाठी जगतो. त्यांच्या त्यागामुळेच आपण निर्धास्त आहोत. अशा वीरांना सलाम करणे हे आपले कर्तव्यच नाही, तर अभिमान आहे. भारतीय सैन्यातील सेवा ही केवळ नोकरी नसून ती राष्ट्रमातेची सेवा आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या त्याग आणि समर्पणामुळेच देशाची अखंडता टिकून आहे.” आसे मनोगत माजी जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी हिप्परगा ता. उदगीर येथील सुपुत्र व भारतीय सैन्य दलात दीर्घकाळ सेवा बजावलेले सैनिक राम पंढरी कानुरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गावकर्यांनी आयोजीत केलेल्या भव्य सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. देशसेवेसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचा गौरव करत गावकऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत सन्मान केला.
या भावनिक आणि प्रेरणादायी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरूके, यमुनाजी भुजबळे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मरल्लापल्ले, चंद्रकांत टेंगेटोल तसेच सरपंच गणेश कानुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले देशाच्या सीमेवर उभा राहून प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी खांद्यावर घेणारा वीर आज तोच वीर आपल्या मातीत परतला आहे.“भारतीय सैन्यातील सेवा ही केवळ नोकरी नसून ती राष्ट्रमातेची उपासना आहे. आपल्या सुखासाठी सैनिक आपले कुटुंब, आनंद आणि आयुष्य सीमारेषेवर अर्पण करतो. अशा वीरांचा सन्मान करणे म्हणजे देशभक्तीचाच खरा अर्थ आहे.” असे ते म्हणाले.
सैनिक राम पंढरी कानुरे यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन करताना देशसेवेचा अभिमान व्यक्त केला. गावातील नागरिकांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार समारंभाला गावातील मान्यवर, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण देशभक्तीने भारावले होते. भारतीय सैन्यात प्रदीर्घ सेवा बजावलेले राम पंढरी कानुरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गावात अभिमान, आनंद आणि भावनांचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला.
गावात त्यांच्या स्वागतासाठी जणू उत्सवाचे रूप धारण झाले होते. फुलांचा वर्षाव, टाळ्यांचा कडकडाट आणि “भारत माता की जय” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रत्येकाच्या नजरेत अभिमान आणि कृतज्ञतेची चमक होती कारण हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर देशासाठी जगलेल्या देशसेवेचा सत्कार होता.
कार्यक्रमाच्या शेवटी एकच भावना प्रत्येकाच्या मनात उमटली “ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य अर्पण केले, त्यांना सलाम करणे हीच खरी देशभक्ती!” यावेळी मोठयाप्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis