
नंदुरबार, 07 एप्रिल, (हिं.स.) - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, नवापूर आणि शहादा या
तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम निवासी शाळा, नंदुरबार येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. प्रवेश अर्जांचे वाटप व स्वीकृती: इच्छुक पालकांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, खामगाव रोड, नंदुरबार येथून प्राप्त करून घ्यावेत. अर्जांचे वाटप आणि स्वीकृती 08 एप्रिल 2026 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) केली जाईल.
प्रवेशासाठी मुख्य अटी व शर्ती:
पात्रता: विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा (ST) असावा.
वयोमर्यादा: बालकाचा जन्म 01 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील असावा.
उत्पन्न मर्यादा: पालकाचे वार्षिक उत्पन्न 01 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. यासाठी आर्थिक वर्ष
2025-26 चा उत्पन्नाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे .
नोकरी: विद्यार्थ्याचे पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावेत, तसे हमीपत्र द्यावे लागेल .
आवश्यक कागदपत्रे:
अर्जदारांनी अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे:
१. विद्यार्थ्याचा जातीचा दाखला.
२. विद्यार्थी किंवा पालकाचा रहिवासी दाखला.
३. बालकाचा जन्माचा दाखला.
४. विद्यार्थ्याचे 2 अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो.
५. विद्यार्थी आणि आई-वडील यांचे आधार कार्ड.
६.दारिद्र्यरेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक व दाखला.
७. पालक मयत असल्यास मृत्यू प्रमाणपत्र.
पालकांनी मुदतीत अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह जमा करावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले
जाणार नाहीत. तसेच चुकीची माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द केला जाईल याची नोंद घ्यावी, असे शासकीय
इंग्रजी माध्यम आश्रम शाळेच्या मुख्यापकांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर