
सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियोजित व सुरळीत करण्याच्या दृष्टीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आज सोलापूर महानगरपालिकेचे महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, सिद्धेश्वर उस्तुर्गे, सर्व विभागीय अधिकारी, कनिष्ठ अभियंते, चावीवाले संबंधित कर्मचारी तसेच महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या‘SCADA’ (Supervisory Control and Data Acquisition) प्रणालीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून पाणीपुरवठा यंत्रणेवर रिअल-टाईम नियंत्रण ठेवणे, गळती शोधणे, दाब व्यवस्थापन आणि पाण्याचे योग्य वितरण सुनिश्चित करणे शक्य होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होण्यामागील प्रमुख कारणांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. विशेषतः महावितरणकडून होणाऱ्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे पाणी उचल केंद्रे (पंपिंग स्टेशन) प्रभावित होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या पाण्यावर होत असल्याचे निदर्शनास आले. यावर उपाययोजना म्हणून महावितरण अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या समन्वयातून अखंड वीजपुरवठा देण्याची जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश देण्यात आले.
यावेळी महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देत सांगितले की,“पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले, “वीजपुरवठा खंडित होणे, यंत्रणेमधील त्रुटी किंवा नियोजनाचा अभाव यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे अजिबात सहन केले जाणार नाही. SCADA प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर करून पाणी वितरण अधिक पारदर्शक आणि नियंत्रित पद्धतीने करावे.”
महापौरांनी शहरातील पाणीपुरवठ्याचे प्रभावी नियोजन करण्यावर भर देत तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करून समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
बैठकीत पाण्याचे टप्पे (रोटेशन) निश्चित करणे, गळती रोखणे, जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे तसेच नागरिकांना कमी त्रास होईल अशा पद्धतीने वितरण व्यवस्था मजबूत करण्याबाबतही सखोल चर्चा करण्यात आली.एकूणच, सोलापूर शहरातील पाणीपुरवठा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड