
लातूर, 07 एप्रिल (हिं.स.)। लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या सोयाबीन चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला असून, अत्यंत कौशल्याने तपास करत ६ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तीन पिकअप वाहनांसह एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर अहमद पठाण (रा. हाडको कॉलनी, लातूर) यांच्या गोडाऊनचे कुलूप तोडून १४ मार्च २०२६ रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी २ लाख ५० हजार रुपये किमतीचे १०० कट्टे सोयाबीन चोरून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने तपास सुरू केला.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अभिषेक सुहास यादव, सुशील सुनील नाथभजण, अजय महादेव जमदाडे, रमजान वजीर शेख, आर्यन माणिक कांबळे आणि विनोद गोविंद सुरवसे या सहा जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीचे सोयाबीन आणि गुन्ह्यात वापरलेली १२ लाख रुपये किमतीची तीन पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चवरे, पीएसआय मुन्ना देशमुख आणि त्यांच्या पथकाने केली. या यशस्वी कारवाईमुळे व्यापारी व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांनी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis