
परभणी, 07 एप्रिल (हिं.स.) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत राज्यभर सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात हे सर्वेक्षण दि. ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी ही संस्था कार्यरत आहे.
अमृतच्या लक्षित गटामध्ये सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा २५ जातींचा समावेश आहे, आणि सर्वेक्षणानंतर यादीत वाढ होण्याची शक्यता आहे.
संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, रोजगारक्षम कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाह्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन तसेच उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक व्याज परतावा योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये लक्षित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध वयोगटातील लाभार्थ्यांसाठी मूल्यवर्धित योजना तयार करण्याचा मानस आहे.
सर्वेक्षणाचा उद्देश लक्षित गटातील कुटुंबांची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, तसेच उपलब्ध स्थानिक संसाधने, कौशल्य व आवडीच्या आधारे योजना आखणे आहे. आवश्यकता भासल्यास या सर्वेक्षणाचा कालावधी वाढविण्यात येईल.
जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी या सर्वेक्षणासाठी लक्षित गटातील नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला, बीएसएनएल कार्यालयाजवळ, परभणी येथे संपर्क साधता येईल.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis