
सोलापूर, 07 एप्रिल : जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती म्हणून संस्कृती सातपुते यांनी आपल्या कामकाजाची अधिकृत सुरुवात केली. सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर सातपुते यांनी जिल्हा परिषदेत आपले कामकाज हाती घेतले.
यावेळी संस्कृती सातपुते म्हणाल्या की, समाजकल्याण विभाग हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मिळालेल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देत प्रत्येक योजना वंचित आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत.तसेच समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुलींची वसतिगृहे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये उपलब्ध सोयी-सुविधांवर विशेष लक्ष ठेवले जाईल, असेही त्या म्हणाल्या.यावेळी त्यांनी माजी आमदार तथा आपले पती राम सातपुते यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपण राजकीय वाटचाल करत असल्याचे सांगितले. तसेच मिळालेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
-----------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड