
नंदुरबार, 07 एप्रिल, (हिं.स.) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात
08 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात साजरा केला जाणार आहे. अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका कळविले आहे.
सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम व उपक्रम:
या सात दिवसांच्या कालावधीत समाजातील सर्व घटकांसाठी प्रबोधनात्मक आणि रचनात्मक कार्यक्रमांची
आखणी करण्यात आली आहे:
उद्घाटन व संविधान जागर: सप्ताहाच्या सुरुवातीला सामाजिक समता सप्ताहाचे रीतसर उद्घाटन
करण्यात येईल. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रास्ताविकेचे) वाटप करण्यात येणार
असून, संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांविषयी विशेष व्याख्याने आयोजित केली जातील.
वैचारिक प्रबोधन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांवर आधारित
व्याख्याने होतील. विशेषतः महाड येथील चवदार तळे सत्याग्रह आणि मानवी हक्कांचे महत्त्व या
विषयावर वक्तृत्व, निबंध आणि लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.
शासकीय योजनांची माहिती: ‘समतादूतांमार्फत’ ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य आणि
लघुनाटिकांद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली
जाईल. तसेच ‘मार्जिन मनी’ योजनेअंतर्गत कार्यशाळाही घेतली जाईल.
महिला व जेष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेल्या
ऐतिहासिक कार्यावर आधारित व्याख्याने आयोजित केली जातील. याशिवाय, जेष्ठ नागरिकांसाठी
जनजागृती शिबीरे व मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
समाजसेवा व स्वच्छता: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये विशेष स्वच्छता अभियान
राबवले जाईल. तसेच आरोग्य सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात
आले आहे.
या सप्ताहादरम्यान महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीही साजरी केली जाणार आहे. या सर्व उपक्रमांमध्ये
जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असेही आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, श्री.
वसावे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर