
अमरावती, 08 अप्रैल (हिं.स.) : अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीने पंधरा वित्त आयोगाच्या निधीच्या विनियोगास मंजुरी देत वर्ष 2025-26 मध्ये झालेल्या 23 कोटी रुपयांच्या ओव्हर ड्रॉपपोटी तीन कोटी रुपयांची परतफेड करण्याचा निर्णय घेतला आहे.
सभापती अविनाश मार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नुकताच महापालिकेला पंधरा वित्त आयोगाचा 15 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याच्या खर्चाचे नियोजनही निश्चित करण्यात आले आहे। त्यानुसार घनकचरा व्यवस्थापनासाठी 4.58 कोटी रुपये, तर पाणीपुरवठ्यासाठी 4.54 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
ओव्हर ड्रॉपच्या परतफेडीसाठी तीन कोटी रुपये राखून ठेवण्यात आले असून उर्वरित 2.88 कोटी रुपये शहरातील विविध विकासकामे व विद्युत देयक भरण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.
स्थायी समितीने शहरातील स्वच्छतेवर विशेष भर देत फवारणी व धुवारणीच्या कामांसाठी कंत्राटदार कोणार्क कंपनीकडून कामे करून घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच दैनंदिन स्वच्छता अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरातील हातपंपांच्या दुरुस्तीची मंजुरीही देण्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी 15 जूनपर्यंत सर्व मोठे नाले व उपनाले साफ करण्याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कामे पूर्वीप्रमाणे अतिक्रमण विभागाद्वारेच करण्याचे निर्देश आहेत.
नगररचना विभागाच्या प्रस्तावानुसार बडनेरा येथील अभ्यासिकेच्या देखभालीसाठी ती एका सामाजिक संस्थेकडे हस्तांतरित करण्यास समितीने मंजुरी दिली आहे. या निर्णयांमुळे शहरातील मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी