नांदेडमध्ये बेकायदेशीर उत्खननावर कारवाई; पाच क्रशर सील
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.) : लोहा तालुक्यातील मारतळा परिसरात बेकायदेशीर दगड उत्खनन करणाऱ्या क्रशर चालकांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. रॉयल्टीपेक्षा जास्त प्रमाणात दगड उत्खनन करूनही मार्च अखेरपर्यंत रॉयल्टी न भरल्यामुळे पाच क्रशरवर सील ठ
नांदेडमध्ये बेकायदेशीर उत्खननावर कारवाई; पाच क्रशर सील


नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.) : लोहा तालुक्यातील मारतळा परिसरात बेकायदेशीर दगड उत्खनन करणाऱ्या क्रशर चालकांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. रॉयल्टीपेक्षा जास्त प्रमाणात दगड उत्खनन करूनही मार्च अखेरपर्यंत रॉयल्टी न भरल्यामुळे पाच क्रशरवर सील ठोकण्यात आले असून संबंधितांना दंडात्मक कारवाईसाठी नोटीस देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित क्रशर चालकांनी खाणीतून गौण खनिजाचे अधिक प्रमाणात उत्खनन करून नियमांचे उल्लंघन केले. तसेच निर्धारित कालावधीत रॉयल्टी न भरता ती थकवली. प्रत्यक्षात उत्खननाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणात खाणीची ईटीएस मोजणी करण्याची मागणीही पुढे आली आहे.

महसूल विभागाच्या पथकाने ही अनियमितता उघडकीस आणत मारतळा शिवारातील तीन आणि वाळकी बुद्रुक येथील दोन अशा एकूण पाच क्रशरवर कारवाई केली. रॉयल्टी थकवून नियमभंग केल्याबद्दल संबंधित क्रशर सील करण्यात आले असून दंडात्मक नोटीसही बजावण्यात आली आहे.

या कारवाईमुळे परिसरातील इतर खनिज व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून पुढील काळात अशा प्रकारच्या तपासण्या अधिक कडक करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

शासनाच्या नियमांनुसार खनिज उत्खनन आणि रॉयल्टी भरणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मंडळ अधिकारी शिवकांता पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या संदर्भात तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही.-----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande