
अमरावती, 08 एप्रिल (हिं.स.)
हमीदराने चणा व तुरीची शासकीय खरेदी बारदाण्याच्या टंचाईने विस्कळीत झाली आहे. काही केंद्रांवरील खरेदी बंद झाली असून बारदाणे पोहोचल्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गोची झाली असून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमरावतीमधील १६ केंद्रांवर खरेदी सुरू असून साडेचार लाख बारदाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.
खुल्या बाजारात चणा व तुरीचे दर पडत असल्याने शासनाने पणन महासंघास नोडल एजंसी नियुक्त करून हमीदराने शासकीय खरेदी प्रारंभ केली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या प्रत्येकी आठ, अशा एकूण १६ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. चणा व तुरीची खरेदी एकाच वेळी प्रारंभ झाल्याने तसेच खुल्या बाजारात कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांवर गर्दी केली. अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याने अंदाज चुकला व बारदाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने दोन लाख, तर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने दीड लाख बारदाणा लागू शकेल, असा अंदाज गृहीत धरून खरेदी सुरू केली होती. मात्र शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने हा अंदाज चुकला व आता खरेदी करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या १६ केंद्रांवर चण्यासाठी ११ हजार ६२० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एक मार्चपासून प्रत्यक्ष खरेदीस सुरवात झाली आहे.
आतापर्यंत दोन हजार १४५ शेतकऱ्यांचा ५८ हजार ५६४ क्विंटल चणा हमीदराने खरेदी झाला आहे. नऊ हजार ४७५ शेतकऱ्यांचा चणा खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. तुरीसाठी जिल्ह्यातील १६ केंद्रांवर आठ हजार ३६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून २० जानेवारीपासून आतापर्यंत तीन हजार ५२४ शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली आहे. चार हजार ५१२ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. आठ हजार रुपये प्रति क्विंटल या हमीदराने एकूण ६१ हजार ३४ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. बारदाणा संपल्याने दोन्ही यंत्रणांनी शेतकऱ्यांना खरेदीसाठीचे संदेश पाठविण्याची गती व केंद्रावर खरेदीची गती मंद केली आहे. पणन महासंघाकडून बारदाणा अद्याप आलेला नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे, तर संदेश मिळालेल्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली असल्याने त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. शेतमाल घेऊन खरेदी केंद्रावर येण्यासाठी लागणारा खर्च व वेळ, यासह श्रम वाया जाऊ लागल्याने या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बारदाण्याची प्रतीक्षा
विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने पणनकडे दीड लाख बारदाण्याची मागणी नोंदविली आहे. गत सप्ताहात पन्नास हजार बारदाणे मिळाले होते. मात्र सद्यस्थिती बघता व पणनकडून होत असलेला विलंब बघता स्वतःच पन्नास हजार बारदाणे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर जिल्हा मार्केटिंगने पणनकडे तीन लाख बारदाण्याची मागणी नोंदविली आहे. आतापर्यंत दोन लाख बारदाणे कामी आले असून सद्यस्थितीत टंचाई बघता खरेदीची गती मंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही यंत्रणांना तातडीने साडेचार लाख बारदाण्याची आवश्यकता असून त्याची प्रतीक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी