
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.) :शहरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित सोनू हत्याकांडाचा छडा लावण्यात भाग्यनगर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कारवाईदरम्यान आरोपींपर्यंत पोहोच साधली. अटक मोहिमेदरम्यान एका आरोपीने पोलिसांवर गोळीबार केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपींना जेरबंद केले.
या प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींपैकी एक अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, शहरात सलग घडत असलेल्या पाच खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात गस्त वाढवली असून, ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis