अमरावती : कलिंगडाच्या भावात घसरण, शेतकरी चिंतेत
अमरावती, 08 एप्रिल (हिं.स.)। उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडाच्या दरात यंदा मोठी घसरण झाली असून, सध्या दर्जेदार कलिंगडाला अवघा ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीला दोन हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल मिळालेले दर आता थेट चारश
कलिंगडाच्या भावात घसरण, शेतकरी चिंतेत शहरात १५रु किलो दराने विक्री


अमरावती, 08 एप्रिल (हिं.स.)। उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडाच्या दरात यंदा मोठी घसरण झाली असून, सध्या दर्जेदार कलिंगडाला अवघा ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीला दोन हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल मिळालेले दर आता थेट चारशे रुपयांवर झाल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाल्याची भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत. कलिंगडाच्या बाबतीत जिल्ह्यात तीच परिस्थिती असल्याचे ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी सांगितले.

बाजारपेठेतील शेतकरी वर्गाच्या दिलेल्या माहितीनुसार, हंगामाच्या सुरवातीला कलिंगडाला चांगले दर मिळाले होते, मात्र गेल्या एक महिन्यापासून दरात सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात कलिंगडाचा हंगाम जोरात असताना व्यापारी मात्र विविध कारणे पुढे करून अत्यंत कमी दराने मागणी करीत आहेत. दर्जेदार मालाचा उठाव कमी झाला असून, दुय्यम प्रतीच्या मालाला तर व्यापारी विचारतही नसल्याची विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. दुय्यम मालाचे सौदे केवळ ३०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून परिसरात दररोज सायंकाळी पावसाळी वातावरण तयार होत आहे. यामुळे कलिंगड उत्पादकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. बहुतांश बागांमधून पहिल्या दर्जाची फळे काढून झाली असून, आता शेतात राहिलेला माल पावसाने खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांकडून होणारी लूट टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आता स्वतःच आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग सुरू केले आहे. व्यापारी कवडीमोल दराने मागणी करीत असल्याने शेतकरी ट्रॅक्टर बैलगाडी व इतर वाहनांमधून अमरावती जिल्ह्यातील विविध मुख्य रस्त्यांवर कलिंगड विक्रीसाठी आणत आहेत. यामध्ये दुय्यम प्रतीचा माल १० रुपये किलो, तर चांगल्या दर्जाची फळे १५ रुपये किलो दराने ग्राहकांना थेट विकली जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande