
अमरावती, 08 एप्रिल (हिं.स.)
अचलपूर परिसरात रस्ते विकास कामासाठी प्रस्तावित मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध करत कामाला अखेर रेड सिग्नल दिला. सुमारे 6 किलोमीटर रस्त्यासाठी 300 झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. त्यापैकी सुमारे 50 झाडांची तोड करण्यात आली होती, मात्र उर्वरित 250 झाडे वाचवण्यात यश आले आहे.वृक्षमित्र तसेच जनहित याचिकाकर्ते श्रीकांत देशपांडे, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी योगेश खानझोडे आणि प्यारेलाल प्रजापती यांनी सकाळीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत वृक्षतोड तात्काळ थांबवण्यास भाग पाडले. या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेचा (केस क्रमांक SM2/2020) सविस्तर अहवाल सादर करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.दरम्यान, ही याचिका प्रलंबित असताना एनएच विभागाने वृक्षतोडीसाठी कार्यादेश दिल्याने संबंधित विभाग आणि परवानगी देणाऱ्या वनविभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोणतीही सखोल पडताळणी न करता एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.“आम्ही आपले आयुष्य जगलो, पण पुढील पिढ्यांसाठी वृक्ष वाचवणे ही आपली जबाबदारी आहे,” असा संदेश देत नागरिकांनीही पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी