
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यात आणि विशेषतः शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. खून, अवैध वाहतूक आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
ही मागणी खा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. अलीकडच्या काळात नांदेड जिल्ह्यात, विशेषतः शहरात, कायदा व सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अवघ्या तीन दिवसांत पाच खुनांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा धाक कमी झाला आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला ठोस पावले उचलण्याचे आवाहन करत, गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने विशेष मोहीम राबवण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis