
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी शहरातील मुख्य पुतळा परिसराचे निरीक्षण करून तयारीचा आढावा घेतला. महामानवांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या.
महापौरांनी पुतळा परिसरातील विद्युत रोषणाई, सुशोभीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि फिरत्या शौचालयांची उपलब्धता याची बारकाईने पाहणी केली. तसेच जयंतीच्या मिरवणूक मार्गावर स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्याचे निर्देशही दिले.
कविता मुळे यांनी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांना शिस्तीत आणि सुरक्षितरित्या बाबासाहेबांचे दर्शन घेता यावे, यासाठी नियोजनाचा आढावा घेतला. महापौर म्हणाल्या, नांदेड शहरात महामानवाच्या जयंतीचा मोठा उत्साह आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून अनुयायांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पुतळा परिसरात स्वच्छतेसह सर्व मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांनी बाबासाहेबांची जयंती शांततेत आणि शिस्तीने साजरी करावी.
या पाहणी दौऱ्यात नगरसेवक दयानंद वाघमारे, नगरसेवक प्रतिनिधी संघरत्न कांबळे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, क्षेत्रीय अधिकारी गौतम कवडे, उद्यान विभागाचे गिरीश काठीकर, कनिष्ठ अभियंता ठानेदार तसेच पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis