
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)। राज्य विधानमंडळ अंदाज समिती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. राज्याच्या तिजोरीतून खर्च होणाऱ्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी ही महत्त्वाची समिती थेट मैदानात उतरणार आहे. या दौऱ्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणा कमालीच्या अलर्ट मोडवर आल्या असून, रखडलेल्या कामांनाही वेग आला आहे.
या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही समिती केवळ एसी दालनात बसून फाईल्स तपासणार नाही, तर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामाचा दर्जा आणि गती यांची पाहणी करणार आहे.
अंदाज समितीचा दौरा म्हणजे प्रशासनासाठी मोठी परीक्षाच असते. त्यामुळे सर्व विभागांचे प्रकल्प, चालू असलेली कामे आणि कार्यालये चकाचक करण्यात आली आहेत. समिती सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत सर्व अधिकारी तयारीला लागले आहेत.
महसूल, वन विभाग, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, कृषी, ग्रामविकास, गृह विभाग आणि नगरविकास यांसह तब्बल २५ हून अधिक विभागांच्या कामांचे मूल्यमापन ही समिती करणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मृद व जलसंधारणाचे प्रकल्प यांकडे समितीचे विशेष लक्ष राहणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis