अमरावती जिल्हा परिषदेत शिस्तीचा धडाका; नव्या सीईओ सत्यम गांधींचे कडक आदेश
अमरावती, 08 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्हा परिषदेत नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनात शिस्त आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी ओळखपत्र वापर आणि हलचल रजिस्टर नोंदणी अनिवार्य करण्याचे
नवीन सीईओ सत्यम गांधी यांचा कडक आदेश; ओळखपत्र व हलचल रजिस्टर अनिवार्य


अमरावती, 08 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्हा परिषदेत नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनात शिस्त आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी ओळखपत्र वापर आणि हलचल रजिस्टर नोंदणी अनिवार्य करण्याचे आदेश जारी केले.

नव्या आदेशानुसार, जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहणार आहे. ओळखपत्राशिवाय काम करणाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच, मुख्यालयाबाहेर दौऱ्यावर किंवा बैठकीसाठी जाण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांनी हलचल रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्यक करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर गांधी यांनी तातडीने विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना काही त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर प्रशासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार करण्यासाठी त्यांनी पाच महत्त्वाचे निर्देश जारी केले.

२०१८ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेले सत्यम गांधी हे कठोर आणि शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कामातील ढिलाई किंवा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही. तसेच, विनाकारण दौऱ्याचे कारण देऊन मुख्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल.

या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत शिस्त वाढण्यास मदत होणार असून कामकाज अधिक प्रभावी आणि पारदर्शक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande