
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.)।किनवट तालुक्यातील बिल्लोरी (कि) येथील जिल्हा परिषद शाळेला आग लागल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या संदर्भातील माहिती पूर्णपणे चुकीची असून शाळेला कोणतीही आग लागलेली नाही व शाळेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. बिल्लोरी (कि) येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात किनवट नगरपालिकेच्या वतीने उद्यान उभारणीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान परिसरातील झाडे-झुडपे तोडून स्वच्छता करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीकडून एकत्रित करण्यात आलेल्या कचऱ्यास आग लावण्यात आली. या आगीचा भडका मोठा दिसत असला तरी त्याचा शाळेशी कोणताही संबंध नव्हता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या घटनेत शाळेला कोणतीही हानी पोहोचलेली नाही व शाळा पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी महामुने यांनी दिली. तसेच, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये व अप्रमाणित संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis