बेमोसमी पावसाचा फटका : नांदेड जिल्ह्यात ज्वारीचे दर गगनाला, तूरडाळही महाग
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.) : ग्रामीण भागातील प्रमुख अन्नधान्य असलेल्या ज्वारीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, बेमोसमी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. सध्या ज्वारीचा दर प्रति क्विंटल सुमारे ५५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर त
बेमोसमी पावसाचा फटका : नांदेड जिल्ह्यात ज्वारीचे दर गगनाला, तूरडाळही महाग


नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.) : ग्रामीण भागातील प्रमुख अन्नधान्य असलेल्या ज्वारीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, बेमोसमी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. सध्या ज्वारीचा दर प्रति क्विंटल सुमारे ५५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर तूरडाळही प्रति किलो १५० रुपयांवर गेली आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात वेळोवेळी झालेल्या बेमोसमी पावसामुळे, धुके आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे गहू, ज्वारी, हरभरा तसेच आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाढती महागाई आणि मजुरांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. सिंचन सुविधांमध्ये वाढ झाल्याने लागवड क्षेत्र वाढले असले तरी उत्पादनात मात्र घट झाली आहे.

ग्रामीण भागात ज्वारीची भाकर, चटणी, भाजी हे रोजच्या आहारातील महत्त्वाचे घटक आहेत. मात्र उत्पादन घटल्यामुळे ज्वारीचे दर वाढले असून, किरकोळ बाजारात ज्वारी ५० ते ५५ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

मुक्रमाबाद, बाहऱ्हाळी, एकलारा, बेटमोगरा आणि रातोळी या भागात ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून उत्पादनात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. परिणामी ज्वारीप्रेमींना वाढत्या दरांचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, आरोग्याच्या दृष्टीने ज्वारीचे महत्त्व लक्षात घेता अनेक डॉक्टरांकडून मधुमेह, ऍसिडिटी, हृदयरोग यांसारख्या आजारांमध्ये ज्वारीची भाकर खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कमी उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, शासनाने ज्वारी व डाळी स्वस्त दरात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच इंधन, खाद्यतेल आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.-----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande