
— रात्री विमानसेवेचा मार्ग लवकरच मोकळाअमरावती, 08 एप्रिल (हिं.स.) :अमरावतीतील बेलोरा विमानतळावर रात्रीच्या विमानवाहतुकीसाठी अत्यावश्यक असलेली डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज (डीव्हीओआर) मार्गदर्शक प्रणाली बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता लवकरच रात्री विमानांचे उड्डाण आणि लँडिंग शक्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, यासाठी अद्याप डीजीसीए आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून अंतिम परवानगी मिळणे बाकी आहे.
डीव्हीओआर प्रणालीमुळे वैमानिकांना धावपट्टीचा अचूक अंदाज घेणे, विमानाचे अंतर, उंची आणि दिशा ओळखणे सोपे होते. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षित लँडिंग आणि टेकऑफसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळते. ही यंत्रणा नसताना कोणत्याही विमानतळावर रात्री विमानसेवा सुरू करणे शक्य नसते.
अमरावती हे विभागीय मुख्यालय असल्याने येथे दररोज विविध राजकीय नेते, मंत्री आणि उद्योजकांचे आगमन होत असते. मात्र, रात्री विमानसेवा उपलब्ध नसल्याने त्यांना नागपूरसारख्या शहरांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च होत होता. अनेकदा सायंकाळनंतर विमानांना विमानतळावरच थांबावे लागत असल्याने प्रवाशांना मुक्काम करावा लागत होता.
डीव्हीओआर प्रणाली बसवल्यानंतर तिची अचूकता तपासणे, यशस्वी चाचण्या घेणे आणि त्यानंतर संबंधित प्राधिकरणांकडून परवानगी मिळवणे ही प्रक्रिया सुरू आहे.
“यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, आता परवानगी आणि परवाना मिळण्याची प्रतीक्षा आहे,” अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे तज्ज्ञ गौरव उपश्याम यांनी दिली.
परवानगी मिळाल्यानंतर बेलोरा विमानतळावर रात्रीची विमानसेवा सुरू होऊन अमरावतीच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी