
अमरावती, 08 एप्रिल (हिं.स.)
उन्हाचा कडाका वाढू लागताच टंचाईचे चटके अधिक तीव्रतेने बसायला सुरवात झाली आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक धग असलेल्या चिखलदरा तालुक्यातील आणखी तीन गावांनी टॅंकरचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत या तीन गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. टंचाईची तीव्रता पाहता आणखी दोन गावांत विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. सध्या चिखलदरामधील मोथा गावाला दोन टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे दोन गावांत विहिरींचे अधिग्रहणसुद्धा करण्यात आले आहे. मात्र आता चिखलदरा तालुक्यातील खडीमल, बहादरपूर आणि गौलखेडा बाजार या तीन गावांचे टॅंकरचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून येत्या तीन ते चार दिवसांत या गावांना टॅंकर लागू शकतात, तसेच आकी व चूनखडी, या दोन गावांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. यंदा फेब्रुवारीच्या अखेरपासूनच पाणीटंचाईला सुरवात झाली. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानाने ४०.४१ अंशाचा आकडा गाठल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली. त्यातच काही गावांना टॅंकरसुद्धा सुरू झाले आहेत. येत्या काळात आणखी अनेक गावांना टॅंकर लागू शकतात. यंदाचे तापमान पाहता मेळघाटातील जवळपास साडेचारशे गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. विशेष म्हणजे वाढोणा रामनाथ, पळसमंडळ, पिंप्री गावंडा (नांदगाव खंडेशवर), बोर्डी व परसापूर (अचलपूर), गणेशपूर व दाभेरी (मोर्शी) तसेच मोथा (चिखलदरा) या गावांत विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
असा आहे टंचाई निर्मूलनाचा आराखडा
प्रस्तावित गावांची संख्या ः ५४५, नळयोजना ५३७, हातपंप ः१७७२, वीजपंप ३९९, खासगी विहिरींचे अधिग्रहण ः १४३, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या ः १५, नळयोजनेची विशेष दुरुस्ती ः २८६, नवीन सिंचन विहिरी व कूपनलिका ः ९७, स्रोत बळकटीकरण ः१२६ एकूण उपाययोजनांची संख्या ः ७२२
सध्या मोथा येथे टॅंकर सुरू असून आणखी तीन गावांसाठी टॅंकरचे प्रस्ताव तसेच दोन गावांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. ते मंजूर झाल्यानंतर या गावांना टॅंकर सुरू केले जातील.
आदित्य तारू, पाणीपुरवठा अधिकारी, चिखलदरा पंचायत समिती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी