
नांदेड, 08 एप्रिल (हिं.स.) :नांदेड शहरातील उस्माननगर रोडवर भरधाव टिप्परच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारूळ येथील ज्येष्ठ विचारवंत, शिवव्याख्याते आणि सामाजिक-धार्मिक कार्यात सक्रिय असलेले ह.भ.प. मधुकर निवृत्ती कदम बारूळकर (वय ५४) हे मोटारसायकलने नांदेडहून बारूळकडे जात असताना ढवळे कॉर्नरसमोर भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्याचप्रमाणे, उस्माननगर रोडवरील सुप्रीम गोल्ड कंपनीसमोर घडलेल्या दुसऱ्या अपघातात गोपाळचावडी येथील संतोष दत्तात्रय लघुळे (वय ३७) यांचा मृत्यू झाला. ते स्कुटीवरून जात असताना भरधाव टिप्परने त्यांना धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचाही जागीच मृत्यू झाला.
गेल्या सात दिवसांत टिप्परच्या धडकेमुळे झालेला हा दुसरा बळी असून, अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच टिप्पर चालकांकडून बेफिकीरपणे वाहने चालवली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संतोष लघुळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार असून ते घरातील एकमेव कर्ते पुरुष होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या पार्श्वभूमीवर टिप्पर चालक व मालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis