
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)। महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून कन्नड येथे '१४ तास सलग वाचन' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे.
हा उपक्रम शालेय, महाविद्यालयीन आणि अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. सलग वाचनाचा हा कार्यक्रम १२ एप्रिल रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत संपन्न होणार आहे. यामध्ये सहभागी होऊन १४ तास वाचन पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, तर उत्कृष्ट पाच विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना ग्रंथभेट दिली जाणार आहे. यासाठी संबधित विद्यार्थ्यांना ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत कन्नड येथील बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयात नोंदणी करावी लागणार आहे.
जागा मर्यादित असल्याने 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' दिले जाणार असून, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis