छ. संभाजीनगर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त हिंगोली जिल्ह्यात 14 एप्रिल 2026 या कालावधीत ''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह'' साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या माध्य
अ


छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त हिंगोली जिल्ह्यात 14 एप्रिल 2026 या कालावधीत 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा प्रसार आणि महामानवांच्या विचारांचा जागर केला जाईल, अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दिली. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन आज करण्यात आले. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष असल्याने 9 एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे मानवी हक्कांवर आधारित व्याख्याने, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. यासोबतच संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 10 एप्रिल रोजी समतादूतांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात पथनाट्यांद्वारे शासकीय योजनांविषयी जनजागृती केली जाईल. तसेच 'मार्जिन मनी' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त श्रीमती गुठ्ठे यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे हे द्विशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विशेष कार्यक्रमांचे शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये 11 एप्रिल रोजी आयोजन करण्यात येईल. 12 एप्रिल रोजी 'संविधान जागर' अंतर्गत संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांविषयी विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तसेच महिला मेळाव्याच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याचा माहिती दिली जाईल. 13 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर व मेळावा आयोजित करण्यात येईल. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्रीमती गुठ्ठे म्हणाल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी अभिवादन कार्यक्रम, चर्चासत्रे आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची माहिती दिली जाईल. या सप्ताहादरम्यान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी आणि लाभार्थ्यांनी या विविध उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande