
रायगड, 09 एप्रिल, (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर येथील खाडीमुखाशी मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने खाडीचे पात्र अरुंद झाले असून मच्छिमारांना बोटी बंदरात आणण्यासाठी भरतीची वाट पाहावी लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून “ग्रोयान्स बंधारा, जेट्टी बांधकाम, पोहोच रस्ता व नौकानयन मार्गातील गाळ काढणे” हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
आक्षी साखर, ता. अलिबाग येथे या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सभापती वैकुंठ पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील तसेच नागावच्या सरपंच श्रीमती हर्षदा मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री राणे यांनी सांगितले की, आक्षी साखर गाव हे खाडीकिनारी वसले असून येथील प्रमुख व्यवसाय मासेमारी व पर्यटन आहे. अलिबाग परिसरात सुमारे १,१०८ मच्छिमार असून वार्षिक ८,७४८ टन मत्स्यउत्पादन होते, तर आक्षी साखर येथे ८६३ मच्छिमारांकडून सुमारे २,२९७ टन उत्पादन घेतले जाते. एकदरा खाडीतही मोठ्या प्रमाणावर मत्स्य उत्पादन होते.
या प्रकल्पाला १९ सप्टेंबर २०२४ रोजी १५९.९२ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी १५१.७८ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. तसेच Maharashtra Coastal Zone Management Authority च्या १९२ व्या बैठकीत (दि. २६ डिसेंबर २०२५) पर्यावरणीय मंजुरीही प्राप्त झाली आहे.
प्रकल्पांतर्गत एकूण २,२३५ मीटर लांबीची लाटरोधक भिंत (पूर्वेकडे १,१२५ मीटर व पश्चिमेकडे १,११० मीटर) उभारण्यात येणार आहे. याशिवाय नौकानयन मार्गातील गाळ काढणे, ८० मीटर x १० मीटर आकाराच्या दोन जेट्टी, जेट्टीमागील भराव आणि ४०० मीटर लांबीचा जोडरस्ता बांधण्यात येणार आहे.
या कामासाठी १२७.६१ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली असून दि. १६ मार्च २०२६ रोजी Yashog Infra Infrastructure and Developers Pvt Ltd यांना हे काम देण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे खाडीतील गाळ साचण्याची प्रक्रिया नियंत्रणात येऊन नौकानयन मार्ग मोकळा होईल. मच्छिमारांना कोणत्याही भरतीवेळी बोटींची सहज ये-जा करता येईल व सुरक्षित बंदर उपलब्ध होईल. तसेच किनारपट्टी संवर्धनामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगारात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी, मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी तसेच आक्षी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)