
बीड, 09 एप्रिल, (हिं.स.) - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-सी वरील धारूर घाट क्षेत्रात वारंवार होणाऱ्या अपघातांची मालिका खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत धारूर घाटाच्या रुंदीकरण आणि सरळीकरणासाठी ३३० कोटी रुपयांच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
धारूर घाटाची एकूण लांबी ११.२४ कि.मी. असून, त्यापैकी ६ कि.मी. अंतराचे रस्ता रुंदीकरण करून चौपदरीकरण करण्यात येणार आहे. उर्वरित ५ कि.मी. अंतराचे १० मीटरपर्यंत रुंदीकरण प्रस्तावित आहे. या कामाचा डीपीआर अंतिम टप्प्यात असून, साधारण ३३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
धारूर घाटासह माजलगाव ते केज या मार्गावरील रस्त्याला पडलेले तडे (क्रॅक्स) भरण्यासाठी २७ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. मोठ्या प्रकल्पासोबतच घाटातील १ तातडीच्या दुरुस्तीसाठी ५७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातून खड्डे भरणे, मुरूम साईड पट्टया तयार करणे आणि संरक्षक रेलिंग बसवणे ही कामे पुढील एका महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis