परभणीत ग्रामरोजगार सेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन
परभणी, 09 एप्रिल (हिं.स.)। ग्रामरोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सुमारे 700 ग्रामरोजगार सेवकांनी 1 एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा परिणाम महात्मा गांधी र
ग्रामरोजगार सेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन


परभणी, 09 एप्रिल (हिं.स.)।

ग्रामरोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सुमारे 700 ग्रामरोजगार सेवकांनी 1 एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा परिणाम महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर होत असून मजुरांना काम मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानात ग्रामरोजगार सेवकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी ग्रामरोजगार सेवकांना दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती; मात्र अद्याप अंमलबजावणी न झाल्याने सेवकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तुटपुंज्या मानधनावर उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. “जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामराव देशमुख, लखन गमे, अशोक कांबळे, बालाजी गायकवाड, कृष्णा कदम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामरोजगार सेवक व सहाय्यक सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande