
पुणे, 09 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय हवामान खात्याने यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन, तो ३१ जुलैपर्यंत कशा प्रकारे पुरविता येईल, याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे दरमहाच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्क्यांनी कपात करावी, अशी सूचना जलसंपदा विभागाने पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) पत्र पाठवून केली आहे.
‘पाणीकपात न केल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास, त्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल,’ असेही पत्रात म्हटले आहे. राज्य सरकारच्या नुकत्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय हवामान खात्याने यावर्षी ‘एल-निनो’ आणि ‘आयओडी’चा प्रभाव याबाबत वर्तविलेला अंदाज या विषयाबाबत चर्चा झाली होती. त्यात यावर्षी मान्सूनचे प्रमाण कमी असल्याचे नमूद केले.
त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करण्यासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यात अवर्षणप्रवण परिस्थिती निर्माण झाल्यास आतापासूनच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे क्रमप्राप्त आहे. जेणेकरून ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, शक्य होईल आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु