
पुणे, 09 एप्रिल, (हिं.स.)। साखर संकुल ते जुना मुंबई-पुणे रस्ता या दरम्यान महापालिकेकडून उड्डाण पूल उभारण्यात येणारआहे. त्यामुळे कृषी महाविद्यालय ते संचेती रुग्णालय या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार असून, विमानतळ, मुंबई-नाशिककडे जाणाऱ्या वाहनांची कोंडीतून मुक्तता होणार आहे.
शिवाजीनगर येथे कृषी महाविद्यालयापासून ते संचेती रुग्णालय या दरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामध्ये नोकरदार, विद्यार्थी, प्रवाशांसह रुग्णांनाही वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. वाहतूक कोंडीची ही समस्या लक्षात घेऊन महापालिकेकडून कृषी महाविद्यालयाजवळील साखर संकुल ते जुना मुंबई- पुणे महामार्ग या दरम्यान महापालिकेकडून उड्डाण पूल उभारला जाणार आहे. महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून संबंधित प्रस्ताव तयार केला असून, अंदाजपत्रकाला मान्यताही मिळाली. प्रकल्पासाठी ६१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु