आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त रायगडमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल
रायगड, 09 एप्रिल, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “आंबेडकर सामाजिक सप्ताह” साजरा करण्यात येत असून जिल्हाभर विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या
डॉ


रायगड, 09 एप्रिल, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “आंबेडकर सामाजिक सप्ताह” साजरा करण्यात येत असून जिल्हाभर विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाची सुरुवात विविध प्रबोधनपर उपक्रमांनी होत असून दि. ९ एप्रिल रोजी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये प्रमुख कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर तसेच चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक चळवळीवर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता अभियानावर मार्गदर्शन होणार असून विद्यार्थ्यांकडून भारुड व लघुनाट्य सादर केले जाणार आहे.

दि. १० एप्रिल रोजी अलिबाग येथे दलित वस्तीत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून आयटीआय कॉलेजमध्ये मार्जिन मनी योजनेवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पेण येथे त्यांच्या समाजकार्यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १२ एप्रिल रोजी पनवेल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर होणार असून दि. १३ एप्रिल रोजी खालापूर येथे रक्तदान शिबिर तसेच कामोठे येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

दि. १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबाग येथे पदयात्रा काढण्यात येणार असून संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येईल. तसेच शासकीय वसतिगृहात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सामाजिक सप्ताहाच्या माध्यमातून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande