
अमरावती, 01 मे (हिं.स.)।सूर्य अगदी डोक्यावर येणार असल्याने ७ ते २६ मेपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला दुपारी १२ वाजता सावली गायब होण्याचा अनुभव घेता येणार आहे. २५ मे रोजी अमरावती शहरासह जिल्ह्यात सावली काही काळापुरती गायब होईल.
कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन रेषांच्या मधल्या पट्ट्यातच सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरूप पडतात. त्यामूळे या भागातूनच वर्षातून दोनदा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. आपली सावली आपल्या पायातच राहील तर सरळ उभ्या वस्तूची सावलीच दिसणार नाही. कर्कवृत्तांच्या उत्तरेकडे आणि मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. त्यामूळे तेथे नेहमी तिरपी सावली पडते. पृथ्वीचा अक्ष जर संरळ ९० अंक्षात असता तर विषुववृत्तावर नेहमीसाठी शून्य सावली अनुभवता आली असती. सूर्य दररोज ०.५० अंशच सरकतो म्हणून तो एकाच अंशावर दोन दिवस राहतो. एका अक्षांशावर येणाऱ्या सर्व परिसरात एकाच वेळी शून्य सावलीचा अनुभव येतो. वस्तू समांतर पृष्ठभागावर एखादा दंडगोल, पेन्सील अथवा तत्सम वस्तू अगदी सरळ उभी ठेवून शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. ७ मे कोल्हापूर, मिरज, सांगली, १० मे सातारा, अक्कलकोट, ११ मे वाई, महाबळेश्वर, १२ मे बारामती, बार्शी, १३ मे लातूर, १४ मे अलिबाग, दौंड, पूणे, १५ मे मुंबई, १६ मे नगर, कल्याण, नादेड, ठाणे, १८ मे पैठण, १९ मे जालना, २० मे संभाजी नगर, नाशिक, २१ मे मनमाड,२२ मे यवतमाळ, २३ मे बुलढाणा, मालेगाव, २४ मे अकोला २५ मे अमरावती, २६ मे जळगाव, भुसावळ आणि नागपूर येथे शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. या ठिकाणी ठिक दुपारी १२.०० वाजता सूर्य अगदी डोक्यावर येईल. सर्व खगोल प्रेमींनी आपापल्या शहरात शून्य सावलीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर व प्रविण गुल्हाने यांनी केले आहे. या घटनेविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास संपर्क साधावा. असे आवाहनही केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी