
बेलोरा येथे आई-वडिलांच्या समाधीला नतमस्तक होऊन नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात
अमरावती, 02 मे (हिं.स.)। जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचे शिवसेनेत (शिंदे गट) मध्ये प्रवेशानंतर दणक्यात स्वागत करण्यात आले. ३० एप्रिल २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. या राजकीय घडामोडीनंतर प्रथमच जिल्ह्यात आगमन होताच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
जिल्ह्यात दाखल होताच बच्चू कडू यांनी आपल्या मूळ गावी बेलोरा येथे जाऊन आई-वडिलांच्या समाधीला नतमस्तक होत नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. तत्पूर्वी बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनी बचू कडू यांचे औक्षवण केले.
या भावनिक क्षणाला उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. गावात त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणांनी बेलोरा परिसर दुमदुमून गेला होता.
यानंतर अमरावती शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात नेहरू मैदान येथून करण्यात आली. शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण करत रॅली अंबादेवी मंदिर येथे पोहोचली, जिथे बच्चू कडू यांनी महाआरती करून दर्शन घेतले. त्यानंतर Jजयस्तंभ चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
रॅली पुढे इर्विन चौक येथे पोहोचली, जिथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर बच्चू कडू यांनी संत गाडगे बाबा गाडगेनगर येथे जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि समाजसेवेच्या कार्याला पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
संपूर्ण रॅलीदरम्यान “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. समर्थकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उत्साह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.
शेवटी बच्चू कडू चांदूर बाजारकडे रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेत प्रवेशानंतर बच्चू कडू यांची ताकद वाढल्याचे चित्र दिसत असून, आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी