छ. संभाजीनगर - मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने यंत्रणांना आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अतिवृष्टी, महापूर आदी आपत्तींचा सामना करण्यासाठी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्या
अ


छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अतिवृष्टी, महापूर आदी आपत्तींचा सामना करण्यासाठी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देत आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे व प्रतीक्षा भुते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, नगर परिषद, अग्निशमन विभाग, जलसंधारण विभागासह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.गुप्ता म्हणाले की, महसूल व पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांची तसेच त्यांच्या संपर्क क्रमांकांची अद्ययावत माहिती तयार ठेवावी. कृषि विभागाने संभाव्य महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यासाठी मनुष्यबळासह यंत्रणा सज्ज ठेवावी. होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर आकडेवारीत एकवाक्यता ठेवावी, जेणेकरून नुकसानीचा अचूक अंदाज येईल. जिल्ह्यातील कालवे, साठवण तलाव, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधकामे तसेच नद्यांवरील केटीवेअर यांच्या दुरुस्तीबाबतची माहिती तात्काळ सादर करून कालवे व तलाव दुरुस्तीची सद्यस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुपता यांनी दिले.

पूरप्रवण 70 गावांतील अतिक्रमणधारकांना नोटीस देण्याच्या सूचना देत, पावसाळ्यात महापुराचा धोका असलेल्या गावांमध्ये दवंडीव्दारे नागरिकांना पूर्वसूचना द्यावी. गावांना पाण्याचा वेढा पडल्यास पर्यायी रस्त्यांची माहिती उपलब्ध ठेवावी. आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व संबंधितांचे संपर्क क्रमांक असलेली दिनदर्शिका तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावेत. कुशल जलतरणपटूंची संपर्क यादी तयार ठेवावी. आरोग्य विभागाने डॉक्टरांची उपलब्धता, संपर्क क्रमांक व प्रथमोपचार पेट्यांची तयारी ठेवावी. गटविकास अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था सुनिश्चित करावी.

रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने तात्काळ देखभाल व दुरुस्ती करून आठवड्याभरात अहवाल सादर करावा. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नद्या व नाल्यांचे खोलीकरण आवश्यक असलेल्या ठिकाणांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, त्यानंतर जिल्हा प्रशासन त्यास मान्यता देईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना व प्रकल्पांचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. महापुरात संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी तयार ठेवावी तसेच नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी. राज्य राखीव पोलीस दलाने सतर्क राहावे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने आपत्ती काळात आवश्यक उपकरणे व वाहनांची व्यवस्था ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande