
छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)। आधार कार्डमधील मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतनीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, मुंबई प्रादेशिक कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जनजागृतीसाठी विशेष पावले उचलली जाणार आहेत.
महाराष्ट्र दिनी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, 5 आणि 15 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेबद्दल रहिवाशांना माहिती देण्यासाठी ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’कडून जिल्हाधिकारी कार्यालयांना 'डिस्प्ले स्टँडी' वितरित करण्यात येत आहेत.
शाळा आणि शासकीय कार्यालयांत , ही मोहीम निरंतर राबवण्याचे नियोजन आहे. या माहितीपर स्टँडीजचा वापर स्थानिक शाळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी केला जाणार आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटसाठी या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
मुलांचे आधार बायोमेट्रिक वेळेत अपडेट न केल्यास आधार कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता असते. ही अडचण टाळण्यासाठी जिल्ह्यांनी तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील पालकांनी आपल्या 5 आणि 15 वर्षे पूर्ण झालेल्या पाल्यांचे बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis