अमरावती महापालिका क्षेत्रात बीएलओंवर कामाचा दबाव वाढला
मतदारयादी मॅपिंग १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
मॅपिंगच्या उद्दिष्ट्यपूर्तीनंतर लगेच जनगणनेचा भार अमरावती व बडनेरा मतदारसंघातील बीएलओंना १५ मे डेडलाइन


अमरावती, 01 मे (हिं.स.) : महापालिका क्षेत्रातील बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) यांना मतदारयादी मॅपिंगचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच त्यांच्याकडे जनगणनेची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

बडनेरा आणि अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातील बीएलओंवर सध्या मोठा दबाव निर्माण झाला असून, अवघ्या १५ दिवसांत मॅपिंगचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५७५ बीएलओ हे अमरावती व बडनेरा या दोन मतदारसंघांमध्ये कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरात आतापर्यंत सुमारे ६७ टक्के आणि बडनेऱ्यामध्ये ७१ टक्के मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये हे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला असून, सुमारे ११० बीएलओंची कामगिरी ६० टक्क्यांखाली असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना काम तातडीने गतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, १५ मेपासून स्वयंजनगणनेची प्रक्रिया सुरू होणार असून त्यामध्ये अनेक बीएलओंचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामुळे मॅपिंगचे प्रलंबित काम त्या आधी पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या सर्व घडामोडींमुळे बीएलओंवर दुहेरी जबाबदारी येऊन पडली असून, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande