माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. परतूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्व
अ


छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. परतूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेथलिया यांच्या निधनाची बातमी समजताच परतूर-मंठा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली असून कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सुरेशकुमार जेथलिया हे परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. आमदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांवर मोठ्या प्रमाणात भर दिला. रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत अनेक विकासकामे मार्गी लावली.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे, त्यांच्या अडचणी समजून घेणारे आणि प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधणारे नेतृत्व म्हणून सुरेशकुमार जेथलिया यांची वेगळी ओळख होती. कार्यकर्त्यांमध्ये त्यांची मजबूत पकड होती. 15 मे 2025 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी हा राजकीय निर्णय घेतला होता. नुकत्याच पार पडलेल्या परतूर नगर परिषद निवडणुकीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. अत्यंत काट्याच्या लढतीत नगराध्यक्षपद थोडक्यात हुकले असले, तरी त्यांच्या निवडणूक नियोजनशैलीची सर्वत्र चर्चा झाली होती. शेवटपर्यंत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

दरम्यान, सुरेशकुमार जेथलिया यांच्या अचानक झालेल्या निधनाने परतूर-मंठा मतदारसंघाने एक अभ्यासू, विकासाभिमुख आणि लोकांशी घट्ट नाळ जुळलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande