
लातूर, 01 मे (हिं.स.) उदगीर शहरातील नागराज बुरांडे यांनी पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असताना नुकत्याच झालेल्या पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) परीक्षेत यश संपादन करत अधिकारी पदावर झेप घेतली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे उदगीर शहरासह त्यांच्या मूळ गाव देवर्जन येथे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागराज बुरांडे हे आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवे सोबतच मित्रत्वाच्या स्वभावामुळे ओळखले जातात. पोलीस अधिकारी म्हणून नव्हे तर एक जिवलग मित्र म्हणून समाजात वावरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. देशभक्तीची भावना, समाजकार्याची आवड आणि सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे नाते यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
पीएसआय पदासाठी त्यांची निवड झाल्याची बातमी समोर येताच सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. त्यांच्या या यशाबद्दल उदगीर येथील वाव कॅफे येथे मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त केला. यावेळी डॉक्टर रवी मुळे ,प्रशांत ममदापूर, राजेश शेटकार,अभिजीत पाटील,माधव रोडगे , स्वप्निल जोशी,प्रसाद पांढरे ,रुद्रा वाकुडे उपस्थित होते.
नागराज बुरांडे यांच्या या यशामुळे उदगीरच्या भूमीतून आणखी एक सक्षम अधिकारी घडल्याचा आनंद सर्वत्र व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis