रायगडच्या खालापूरमध्ये बेकायदेशीर माती उत्खननाचा गंभीर प्रकार
डोंगर कापणीमुळे पर्यावरण धोक्यात रायगड, 01 मे (हिं.स.) :खालापूर तालुक्यातील आनंदवाडी आणि सावराली परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर माती उत्खनन आणि अनियंत्रित डोंगर कापणी सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गट क्रमांक ४९/५ ते ४९/२० या भागात
Illegal soil excavation in Anandwadi-Savarali; Question mark on the role of the Revenue Department


Illegal soil excavation in Anandwadi-Savarali; Question mark on the role of the Revenue Department


डोंगर कापणीमुळे पर्यावरण धोक्यात

रायगड, 01 मे (हिं.स.) :खालापूर तालुक्यातील आनंदवाडी आणि सावराली परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर माती उत्खनन आणि अनियंत्रित डोंगर कापणी सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गट क्रमांक ४९/५ ते ४९/२० या भागात जेसीबी मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

या उत्खननासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्या नसल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अत्यल्प रॉयल्टी भरून मोठ्या प्रमाणावर माती उपसा केला जात असल्याने शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे.

डोंगराळ भागात सुरू असलेल्या अनियंत्रित कापणीमुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे. विशेषतः पावसाळ्यात भूस्खलन आणि दरडी कोसळण्यासारख्या दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी तहसीलदार खालापूर यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले असून, तात्काळ पाहणी करून सुरू असलेले उत्खनन बंद करावे, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि वापरात असलेली यंत्रसामग्री जप्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महसूल विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “महसूल अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत आहेत का?” असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेपामुळेच या बेकायदेशीर उत्खननाला चालना मिळत असल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे.

“कोण आधी डोंगर साफ करतो” अशी स्पर्धा सुरू असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास पर्यावरणीय हानी अधिक गंभीर स्वरूप धारण करेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande