लातूरमध्ये सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण
लातूर, 01 मे (हिं.स.) : वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लातूर सायबर पोलीस ठाण्याची नूतनीकृत व अद्ययावत इमारत महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्र
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


लातूर, 01 मे (हिं.स.) : वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लातूर सायबर पोलीस ठाण्याची नूतनीकृत व अद्ययावत इमारत महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात या नव्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नव्याने भरती झालेल्या ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच ‘क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग’ या अभिनव उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास विधान परिषद आमदार विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संजय बनसोडे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री भोसले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाला आधुनिक सुविधा व सुसज्ज निवास उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातही पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

लातूर पोलीस दलाने गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केली असून ड्रग्जविरोधी कारवाई तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्ष राहण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सायबर पोलीस ठाण्यांचे सक्षमीकरण आवश्यक असल्याचे आमदार विक्रम काळे यांनी नमूद केले. शहरात अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षाव्यवस्था बळकट करण्यावर त्यांनी भर दिला.

आमदार अमित देशमुख यांनी लातूरची राजकीय संस्कृती पोलीस दलाच्या पाठीशी उभी राहणारी असल्याचे सांगितले आणि सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीची गरज व्यक्त केली. खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनीही पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक केले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी प्रास्ताविक करताना ‘आपले लातूर, सुरक्षित लातूर’ या उपक्रमांतर्गत ५१० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच ‘पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर’ या उपक्रमातून शेतीविषयक वाद सोडवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सायबर फसवणूक, व्यसनाधीनता आणि वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी ‘लोकशक्ती रिल्स स्पर्धा’ सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेचे माहितीपत्रकही यावेळी प्रकाशित करण्यात आले.

क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणा आता जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांत राबवली जाणार असून ९०७ ठिकाणी क्यूआर कोड बसविण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे गस्त अधिक प्रभावी होणार असल्याचे सांगण्यात आले.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande