‘प्रोजेक्ट आशाये’चा शुभारंभ; ठाणे जिल्हा प्रशासनाचा प्लास्टिकमुक्तीचा निर्धार
ठाणे, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ठाणे जिल्हा प्रशासन आणि वेसॅक इंडिया (VesacIndia) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आशाये’ या अभिनव उपक्रमाचा साकेत रोड येथे शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार
Launch of 'Project Ashaye'; Thane District Administration's determination to be plastic-free


ठाणे, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ठाणे जिल्हा प्रशासन आणि वेसॅक इंडिया (VesacIndia) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आशाये’ या अभिनव उपक्रमाचा साकेत रोड येथे शुभारंभ करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या सहकार्याने सुरू झालेला हा उपक्रम देशातील पहिला प्रशासकीय पथदर्शी प्रकल्प ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रकल्पाशी संबंधित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

ठाण्याचे ‘ट्री-मॅन’ विजयकुमार कट्टी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी ‘एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक’ला सक्षम पर्याय देण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. ५ जून जागतिक पर्यावरण दिनापर्यंत जिल्ह्यात ज्या भागात प्लास्टिकचा वापर सर्वाधिक आहे, त्या ठिकाणच्या छोट्या विक्रेत्यांना NWPP (Non-woven Polypropylene) बॅग्स वाटप करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट ६२ टन प्लास्टिकमुक्तीचे आहे. अधिकाऱ्यांच्या दानातून उपलब्ध होणाऱ्या या पिशव्या प्लास्टिकला दीर्घकालीन पर्याय ठरणार आहेत. तसेच केवळ बंदी घालण्याऐवजी विक्रेत्यांना पर्यावरणपूरक पर्याय देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.

जुन्या कपड्यांपासून तयार करण्यात आलेल्या पिशव्यांमुळे ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पनाही राबवली जात आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प कोणत्याही बाह्य निधीशिवाय राबवला जात असून, भविष्यात राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

“पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ बनवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे मत विजयकुमार कट्टी यांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande